इयत्ता १० वी · मराठी · भाग २

५. दोन दिवस (कविता)

कवी — नारायण सुर्वे | कवितेचा संपूर्ण स्वाध्याय, रसग्रहण आणि स्वमत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

१कृती पूर्ण करा.
  • (अ) 'रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत' या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
    "भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली."
  • (आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
    "दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो"
२एका शब्दांत उत्तर लिहा.
  • (अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट — हात (कवीचे हात)
  • (आ) कवीचा जवळचा मित्र — अश्रू
३खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
  • (अ) माना उंचावलेले हात : स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कष्टांवर विश्वास असल्यामुळे स्वाभिमानाने आकाशाला गवसणी घालण्यासाठी उंचावलेले हात.
  • (आ) कलम केलेले हात : गरिबीमुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे जेव्हा कवीच्या हातांना काम मिळत नव्हते, तेव्हा ते हात जणू कुणीतरी कापून (कलम करून) टाकले आहेत, अशी कवीची हतबल अवस्था झाली होती.
  • (इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात : गरिबीतून सुटका मिळवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कवीला आयुष्यभर काबाडकष्ट करावे लागले. जणू काही त्यांचे हात दारिद्र्याकडे (गरिबीकडे) तारण म्हणून ठेवले होते.

Advertisement

४काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
'दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे'

आशयसौंदर्य : 'दोन दिवस' या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी कामगार आणि कष्टकरी माणसाच्या जीवनाचे वास्तववादी चित्र रेखाटले आहे. गरिबांच्या आयुष्यातील दुःखांचा सामना करत असताना माणसाची कशी फरफट होते, याचे वर्णन वरील ओळींत केले आहे.

काव्यसौंदर्य : माणसाचे आयुष्य खूप छोटे असते. कवीने त्याला 'चार दिवसांचे आयुष्य' असे म्हटले आहे. या चार दिवसांपैकी दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात निघून गेले आणि उरलेले दोन दिवस पोटापाण्याच्या विवंचनेत, दुःखात गेले. आता आयुष्याचे किती उन्हाळे (वर्षे) शिल्लक राहिले आहेत, याचा कवी हिशोब करत बसला आहे. गरिबीत जगणाऱ्या माणसाच्या आयुष्याची ही शोकांतिका या ओळींतून अत्यंत हृदयस्पर्शीपणे व्यक्त झाली आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : बोलीभाषेशी जवळीक साधणारी आणि थेट काळजाला भिडणारी साधीसोपी भाषा कवीने वापरली आहे. 'उन्हाळे' या शब्दातून आयुष्यातील रखरखीतपणा आणि संघर्ष सूचित होतो. 'वाट पाहण्यात गेले', 'दुःखात गेले' यांसारख्या संवादात्मक शैलीमुळे कवितेला एक वेगळीच धार प्राप्त झाली आहे.

(आ) 'दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

माणसाच्या आयुष्यात अनेक संकटे आणि दुःखे येत असतात. पण या दुःखांसमोर हार न मानता, न डगमगता त्या दुःखांना धीराने सामोरे गेले पाहिजे (दुःख पेलावे). जीवनाच्या या कठोर शाळेत अनुभवांचे चटके खाऊनच माणूस खऱ्या अर्थाने जगायला शिकतो.

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी रडत बसण्यापेक्षा आलेल्या संकटांचा खंबीरपणे सामना करावा. कितीही वाईट प्रसंग आला तरी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून जगण्याची जिद्द ठेवली पाहिजे, हा अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार या वाक्यातून मला जाणवतो.

(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

कष्टकरी माणसाचे संपूर्ण आयुष्य 'भाकरीचा चंद्र' शोधण्यात म्हणजेच पोटापाण्याची सोय करण्यातच निघून जाते. त्यांच्या नशिबी कायम दारिद्र्य आणि संघर्षच असतो. त्यांचे स्वतःचे असे कोणतेही वेगळे आयुष्य उरत नाही; त्यांचे हात म्हणजे त्यांचे सर्वस्व असते, पण तेही गरिबीकडे गहाण पडलेले असतात.

हे सर्व वाचून कष्टकऱ्यांविषयी माझ्या मनात प्रचंड सहानुभूती आणि आदर निर्माण होतो. त्यांच्या अपार कष्टांमुळेच समाजाचे रहाटगाडगे चालते. मात्र त्यांच्या वाट्याला आयुष्यभर केवळ उपेक्षा आणि दुःखच येते, याचे मला खूप वाईट वाटते. एवढे असूनही ते जगण्याची जिद्द सोडत नाहीत, ही त्यांची प्रबळ इच्छाशक्ती खरोखरच सलाम करण्याजोगी आहे.

(ई) 'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

'दोन दिवस' या कवितेत नारायण सुर्वे यांनी गरिबांचे आणि कष्टकऱ्यांचे विदारक जीवनसत्य मांडले आहे. माणसाच्या आयुष्यातील वास्तवाचे भान देताना कवी म्हणतात की, गरिबाचे आयुष्य हे केवळ चार दिवसांचे असते. त्यातील अर्धे आयुष्य सुखाची वाट पाहण्यात आणि उरलेले अर्धे आयुष्य दुःखाचे ओझे वाहण्यात जाते.

पोटाची खळगी भरण्यासाठी आणि गरिबीशी दोन हात करताना त्यांची स्वप्ने व भावना करपून जातात. झोतभट्टीतून तावून सुलाखून निघणाऱ्या पोलादाप्रमाणे कष्टकऱ्यांचे आयुष्य संकटांच्या भट्टीत शेकून निघते. पोटापाण्याचा प्रश्न माणसाला सर्वकाही विसरायला लावतो, हे भीषण पण तितकेच खरे जीवनसत्य कवीने या कवितेतून प्रखरपणे मांडले आहे.