इयत्ता ९ वी · मराठी · भाग १

४. जी. आय. पी. रेल्वे

प्रबोधनकार ठाकरे — संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नोत्तरे आणि भाषाभ्यास (समास). महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (कुमारभारती).

Advertisement

स्वाध्याय

१रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
  • (१) भारतात सर्वांत पहिली रेल्वे मुंबई येथून सुटली.
    पर्याय: (ठाणे/मुंबई/कर्जत/पुणे)
  • (२) रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी इनाम ठेवले.
    पर्याय: (तिकीट/बक्षीस/इनाम/प्रलोभन)
२आकृतिबंध पूर्ण करा.

भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्वतयारी :

१. पाना-फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून १० मोठे खोलीवजा डबे शृंगारले.
२. इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकवले.
३. डब्यांत गादीच्या खुर्च्या व कोच ठेवले.
४. रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी जीजीभाई, नाना शंकरशेट आणि अनेक इतर नगरशेट जामानिमा करून बसले.
३आकृती पूर्ण करा.
(अ) रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट
(आ) इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे मुंबई ते ठाणे
(इ) रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल १८ एप्रिल सन १८५३
(ई) घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे करशेटजी जमशेटजी

Advertisement

४खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम = गुमास्ते सरळमार्गी = साळसूद आश्चर्य = अचंबा (किंवा नवल) फुकट = मोफत नावाजलेले = नामांकित गंमत = मौज
५कारणे लिहा.

(अ) रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.

कारण : लोकांमध्ये रेल्वेविषयी भलत्याच कंड्या व अफवा पसरल्या होत्या. 'वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे', 'मुंबईला नव्या इमारती व पूल बांधण्यासाठी त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा डाव आहे' अशी लोकांची समजूत झाली होती. लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

(आ) इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.

कारण : सुरुवातीला लोकांनी रेल्वेने प्रवास करावा म्हणून दर माणशी एक रुपया इनाम दिले जात असे. नंतर ते आठ आणे, मग चार आणे झाले. हळूहळू लोकांचा रेल्वेबद्दलचा धीर चेपला आणि प्रवाशांची झुंबड उडू लागली. लोकांची गर्दी वाढल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली व सर्रास तिकिटे चालू केली.

६स्वमत.

(अ) 'रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला', तुमचे मत लिहा.

रेल्वेचा शोध हा खऱ्या अर्थाने क्रांती घडवणारा ठरला. रेल्वेमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक जलद व सोपी झाली. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात कच्चा माल आणि पक्का माल पोहोचवणे सोयीचे झाले, ज्यामुळे उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळाली.

या व्यतिरिक्त, देशांतर्गत बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या गेल्या व व्यापाराचा विस्तार झाला. विविध प्रदेशांतील व्यापार वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. या सर्व गोष्टींमुळे देशाच्या आर्थिक विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली, हे निश्चित.

(आ) स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.

स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय समाजात शिक्षणाचा खूप अभाव होता. त्यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा व अज्ञान मोठ्या प्रमाणावर होते. एखादी नवीन गोष्ट किंवा तंत्रज्ञान आले, की लोक त्याला भुताटकी किंवा वाईट शक्ती मानत असत.

प्रस्तुत पाठातही वाफेवर चालणाऱ्या आगगाडीला लोकांनी 'इंग्रजांची विलायती भुताटकी' मानले होते, तसेच 'पुलांच्या पायात जिवंत गाडण्यासाठी माणसे नेली जात आहेत' अशी अफवा पसरली होती. यावरून दिसून येते की अज्ञानामुळे लोक विज्ञानावर विश्वास ठेवण्याऐवजी अफवांवर आणि अंधश्रद्धांवर लवकर विश्वास ठेवत असत.

(इ) तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.

फायदे : रेल्वेमुळे लांबचा प्रवास कमी वेळात, सुरक्षित आणि सुखकर होतो. इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास स्वस्त असतो. एकाच वेळी हजारो प्रवासी आणि टनावारी माल वाहून नेण्याची क्षमता रेल्वेमध्ये असते. रेल्वेत स्वच्छतागृहे, झोपण्याची सोय असल्यामुळे लहान मुले व वृद्धांसाठी हा प्रवास आरामदायी ठरतो.

तोटे : रेल्वे वेळेवर धावतीलच याची खात्री नसते, कधीकधी खूप उशीर होतो. सणासुदीच्या काळात तिकीट मिळवणे खूप कठीण जाते आणि डब्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. तसेच, रेल्वेचे मार्ग ठराविक असल्याने आपल्याला अगदी घरापर्यंत पोहोचता येत नाही; स्टेशनवरून पुढे जाण्यासाठी इतर वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

भाषाभ्यास — समास

★खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.
'अ' गट 'ब' गट
(१) सूर्याचा उदय झाला. सूर्योदय झाला.
(२) प्रत्येक दिवशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली.

खालील प्रश्नांची उत्तरे द्या :

  • (१) दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ एकच आहे का?
    होय.
  • (२) दोन गटातील शब्द सारखे आहेत का ?
    नाही.
  • (३) अधोरेखित शब्दांमध्ये 'अ' गट आणि 'ब' गटातील शब्दांमध्ये कोणता फरक आहे?
    'अ' गटात शब्दांची फोड करून (विभक्ती प्रत्यय लावून) लिहिले आहे, तर 'ब' गटात विभक्ती प्रत्यय गाळून शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द बनवले आहेत.

बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला 'समास' असे म्हणतात. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला 'सामासिक' शब्द म्हणतात.

समास विग्रह : सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो. या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. वर 'ब' गटात सामासिक शब्द आहेत, तर 'अ' गटात विग्रह आहेत.