इयत्ता ७ वी · मराठी · भाग १

२. श्यामचे बंधुप्रेम

लेखक — सानेगुरुजी | स्वाध्याय, आकृत्या पूर्ण करा व व्याकरण (क्रियाविशेषण अव्यये) — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

स्वाध्याय

प्र. १खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
  1. (अ) नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
    नवीन पाऊस सुरू झाल्यावर तापलेल्या मातीवर पाणी पडते आणि तेव्हा मातीचा एक रम्य व सुंदर वास सुटत असतो.
  2. (आ) श्यामने कोणता निश्चय केला होता?
    आपल्या धाकट्या भावास नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा, असा निश्चय श्यामने दापोलीहून घरी येताना केला होता.
  3. (इ) लहान भावाला आईने कसे समजावले?
    "तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता हट्ट धरू नको," असे आईने लहान भावाला समजावले.
  4. (ई) श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
    श्यामचे वडील कोर्ट-कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला जात असत.
  5. (उ) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
    नवीन कोट बघून आईला आणि भावाला किती आनंद होईल, या सुखस्वप्नात श्याम दंग होता. त्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.
प्र. २खालील आकृत्या पूर्ण करा.

(अ) श्यामला थंडीच्या दिवसांत न मिळणाऱ्या गोष्टी :

मफलर जाकिटे गरम कोट

(आ) श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न :

१. हा लहानसा कोट कोणाचा? (किंवा हा नवीन कोट कोणाला रे?)
२. मोरू जोश्यांकडे का रे द्यावयाचा आहे? (कापातल्या मुक्याने पाठविला असेल!)
३. पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस?
४. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?

Advertisement

प्र. ३का ते लिहा.
  1. (अ) श्यामचे डोळे अश्रूनी न्हाले होते.
    कारण, खाऊचे पैसे साठवून श्यामने आपल्या भावासाठी कोट शिवला होता. जेव्हा तो तयार झालेला कोट त्याने हातात घेतला, तेव्हा भावाबद्दलच्या प्रेमाने व आनंदाने त्याचे डोळे अश्रूंनी न्हाले होते.
  2. (आ) श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.
    कारण, खूप पाऊस पडत होता, नदीनाल्यांना पूर आले असतील व पिसईचा आणि सोंडेघरचा पह्या यांना उतार नसेल, अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी श्यामला जाऊ नको असे म्हटले.
  3. (इ) पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता.
    कारण, पावसाळा नुकताच सुरू झाला होता आणि पावसापाण्याचा जोर खूप जास्त होता.
  4. (ई) श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.
    कारण, श्यामने खाऊचे दिलेले पैसे स्वतःवर खर्च न करता साठवले आणि त्या पैशांतून आपल्या धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून आणला होता. त्याचे हे निखळ बंधुप्रेम पाहून आईला गहिवर आला.
★चर्चा करा. सांगा.

'पंख असते तर एकदम उडून गेलो असतो' यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

श्यामला दापोलीहून आपल्या गावी जाण्याची खूप घाई झाली होती. त्याने आपल्या लहान भावासाठी अत्यंत प्रेमाने खाऊचे पैसे साठवून नवीन कोट शिवला होता. तो कोट भावाला कधी एकदा देतो, असे त्याला झाले होते. वाटेत खडी, पाऊस, अंधार व दुथडी भरून वाहणारे नाले यांची त्याला पर्वा नव्हती. त्याच्या मनात फक्त आपल्या आईचा व भावाचा आनंद दिसत होता. हा आनंद लवकर पाहता यावा म्हणून 'जर मला पक्ष्यांसारखे पंख असते, तर मी चालत जाण्याऐवजी थेट उडत क्षणातच घरी पोहोचलो असतो', अशी त्याची कल्पना असावी.

खेळूया शब्दांशी

(अ)खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.
शब्दविरुद्धार्थी शब्द
थंडगरम
सापडणेहरवणे
सुगंधदुर्गंध
थोरलाधाकटा
नवीनजुना
लक्षदुर्लक्ष
स्मृतीविस्मृती
(आ)गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
  1. समीरा, विनीता, त्यांनी, निखिल.
    गटात न बसणारा शब्द : त्यांनी (कारण 'त्यांनी' हे सर्वनाम आहे व बाकी सर्व नामे आहेत).
  2. मी, सातपुते, त्याने, तिला.
    गटात न बसणारा शब्द : सातपुते (कारण 'सातपुते' हे नाम आहे व बाकी सर्व सर्वनामे आहेत).
  3. हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य.
    गटात न बसणारा शब्द : हिमालय (कारण 'हिमालय' हे नाम आहे व बाकी सर्व विशेषणे आहेत).
  4. लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.
    गटात न बसणारा शब्द : आम्ही (कारण 'आम्ही' हे सर्वनाम आहे व बाकी सर्व क्रियापदे/धातुसाधिते आहेत).

आपण समजून घेऊया (व्याकरण)

★खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.

दिलेले शब्द : तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.

क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार वर्गीकरण केलेले शब्द
कालवाचक क्रियाविशेषण अव्यये दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत.
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये तिथे, पलीकडे, समोरून, वर.
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये टपटप, सावकाश, कसे, झटकन.
परिमाणवाचक / संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये अतिशय, पूर्ण, जरा, मुळीच, थोडा.

लक्षात ठेवा : वाक्यातील क्रिया कधी घडली हे सांगणारे शब्द कालवाचक असतात. कोठे घडली हे सांगणारे स्थलवाचक, कशी घडली हे सांगणारे रीतिवाचक, तर किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली हे सांगणारे शब्द परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये असतात.