इयत्ता ७ वी · मराठी · भाग १

४. गोपाळचे शौर्य

लेखिका — लक्ष्मीकमल गेडाम | संपूर्ण स्वाध्याय, पाठाचा सारांश व व्याकरण — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

पाठाचा सारांश

नागपूर जिल्ह्यातील मोहदी गावातील शाळेची सहल कर्णागडावर गेली होती. सहल संपवून मुले घाटातून खाली उतरत असताना, घाटाच्या खालच्या बाजूने जंगलाला अचानक आग (वणवा) लागलेली गोपाळ या शाळकरी मुलाला दिसली. आग विझवण्यासाठी त्याने तत्परतेने गाडीतून उडी मारली.

स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने शेतातील पाण्याचा पाइप आगीच्या दिशेने ओढून आणला. त्याचे हे धाडस पाहून गुराखी, इतर विद्यार्थी, शिक्षक आणि रस्त्यावरून जाणारे इतर लोक त्याच्या मदतीला धावून आले. सर्वांच्या प्रयत्नांनी आणि अग्निशामक दलाच्या मदतीने ती भयानक आग आटोक्यात आली. गोपाळच्या या जिगरबाज शौर्यामुळे गडावरील झाडे, गुरे आणि गुराखी यांचे प्राण वाचले. या पाठातून गोपाळची परोपकारी वृत्ती आणि संकटात घाबरून न जाता प्रत्यक्ष कृती करण्याचे महत्त्व दिसून येते.

स्वाध्याय

प्र. १खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
  1. (अ) कर्णागड कुठे वसलेला आहे?
    नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेल्या मोहदी या खेडेगावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.
  2. (आ) 'गाडी थांबवा', असे गोपाळ का ओरडला?
    घाटातून गाडी जात असताना घाटाच्या खालच्या बाजूने लागलेली आग (वणवा) गोपाळला दिसली. ती आग विझवली पाहिजे, या उद्देशाने तो 'गाडी थांबवा' असे ओरडला.
  3. (इ) गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
    गोपाळने धावत जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तीनिशी आगीच्या दिशेने ओढायला सुरुवात केली.
  4. (ई) आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
    आग वेळेवर विझली नसती तर गडावरची झाडे-झुडपे, तसेच गुरे-वासरे घेऊन गेलेले गुराखी आणि इतर लोक आगीत भाजून निघाले असते व मोठी जीवितहानी झाली असती.
प्र. २कोण, कोणास म्हणाले ते सांगा.
  1. (अ) "अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू ?"
    असे शिक्षक गोपाळला म्हणाले.
  2. (आ) "माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!"
    असे गोपाळ गुराख्याला म्हणाला.
  3. (इ) "पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो."
    असे शिक्षक मदतीला आलेल्या दुसऱ्या गाडीतील गृहस्थांना म्हणाले.

Advertisement

प्र. ३गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला ? का ते लिहा.

मला गोपाळचे धाडस (शौर्य) आणि निःस्वार्थी व परोपकारी वृत्ती हे गुण खूप आवडले. कारण, जंगलाला लागलेली भयानक आग पाहून इतर लोक आणि शिक्षकही हतबल झाले होते, पण गोपाळ घाबरला नाही. दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. केवळ विचार न करता त्याने तत्परतेने कृती केली, हे मला सर्वाधिक आवडले.

★चर्चा करा. सांगा.

नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा आणि वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे यावर चर्चा करा.

नैसर्गिक आपत्ती : भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वीज पडणे.
मानवनिर्मित आपत्ती : बॉम्बस्फोट, अपघात, दंगल, इमारतीला आग लागणे, वणवा (बहुतांश वेळा).

वणवा लागू नये यासाठी उपाय :

  • डोंगरभागात किंवा जंगलात पर्यटकांनी धूम्रपान करू नये व जळती काडी फेकू नये.
  • जंगलात पार्टी किंवा कॅम्पफायर केल्यास आग पूर्णपणे विझवल्याची खात्री करावी.
  • काही लोक गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात नवीन गवत चांगले येते या समजुतीने आग लावतात, यावर वनविभागाने कडक निर्बंध घालावेत.
  • स्थानिक लोकांनी व गुराख्यांनी याविषयी सतत दक्ष राहावे.

खेळूया शब्दांशी (व्याकरण)

(अ)खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
वाक्य नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
(अ) कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. कर्णागड, गड - एक, पौराणिक आहे
(आ) ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. ड्रायव्हरने, गाडीचा, वेग - - वाढवला
(इ) तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला. पाइप, गोपाळने तो लांब आणला
(ई) सर्वांचेच चेहरे उजळले होते. चेहरे सर्वांचेच - उजळले होते
(आ)कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.

(शब्द : अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा)

  1. (अ) सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.
  2. (आ) भूज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती.
  3. (इ) शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात.
  4. (ई) कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
(इ)'बिन', 'परा' हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
  • बिन (उपसर्ग) : बिनचूक, बिनधास्त, बिनशर्त, बिनतक्रार, बिनडोक.
  • परा (उपसर्ग) : पराजय, पराभव, पराक्रम, पराकोटी, पराधीन.

लक्षात ठेवा : शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षराला किंवा शब्दाला उपसर्ग म्हणतात.

(ई)खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा.
  1. (अ) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
  2. (आ) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
  3. (इ) आईने आशाला शंभरदा बजावले.
  4. (ई) सभोवार दाट झाडी होती.
(उ)कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.

(शब्द : समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)

  1. (अ) पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती.
  2. (आ) मी घटाघटा पाणी प्यायलो.
  3. (इ) समोरून मला आई येताना दिसली.
  4. (ई) सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते.